रियाध – सौदी अरेबियाकडून महिला हक्क कार्यकर्त्या लौजैन अलहॅथलोल यांची आज तुरूंगातून सुटका झाली. बुधवारी त्यांच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सौदी शासनाकडून लौजेन अलहॅथलोल यांच्यावर आणखी काही काळासाठी नियंत्रण ठेवले जाण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियामध्ये महिलांनी वाहन चालवण्यावरील बंदी मागे घेण्यासाठीच्या संघर्षाचे नेतृत्व अलहॅथलोल यांनी केले होते. राजघराण्याच्या आदेशांविरोधात संघर्ष केल्याच्या आरोपाखाली त्या गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. महिलांवरील ड्रायव्हिंग बंदी 2018 मध्ये प्रत्यक्षात मागे घेतली गेली. त्याच्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांना आणि अन्य कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये महिलांच्या वाहन चालवण्यावरील बंदी आणि इतर कायदेशीर निर्बंधांना अलहॅथलोल यांनी आव्हान दिले होते.
बंदी असतानाही त्यांनी स्वत: वाहन चालविण्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. लौजैन यांच्या या व्हिडीओमुळे सौदी अरेबियामध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. याच व्हिडीओमुळे त्या जगभर प्रसिद्धही झाल्या होत्या. लौजैन अलहॅथलॉल यांच्या वडिलांनीच हा व्हिडीओ केला होता. आगामी 10 वर्षात महिलांवरील ड्रायव्हिंग बंदी रद्द होईल, असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.
लौजैन अलहॅथलॉल यांच्या भगिनींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये आपल्या बहिणीची सुटका झाल्याची माहिती दिली आहे.