नवी दिल्ली – आपल्या धर्माने दिलेल्या शिकवणुकीनुसार आपल्याला कारागृहात अन्न दिले जावे अशी मागणी करणारा सत्येंद्र जैन यांचा अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आपण सध्या उपावास करीत आहोत आणि त्यानुसार आपल्याला आहार दिला जावा अशी त्यांची मागणी होती. तथापि जैन यांनी कारागृह प्रशासनाकडे तशी अधिकृत विनंतीच केलेली नाही.
त्यामुळे त्यांना त्यानुसार आहार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे प्रशासनाच्यावतीने आज कोर्टात सांगण्यात आले. त्यांनी कारागृहात सुका मेवा देण्याची मागणी केली आहे. कारागृहाच्या नियमानुसार त्यांना सुका मेवा पुरवता येणार नाहीं असेही कारागृहाच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. आम्ही सर्वच कैद्यांना पोषक आहार देतो असेही कारागृहाच्यावतीने सांगण्यात आले.
धार्मिक उपवास एखाद्या व्यक्तीने स्वत:हून सुरू केलेले उपवास यात फरक असतो, त्यामुळे व्यक्तीगत उपवासाच्या अनुषंगीक आहार त्यांना देता येणार नाही असेही कारागृह प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सत्येंद्र जैन हे जैन धर्मिय आहेत. त्यामुळे आपण आपल्या धार्मिक शिकवणुकीनुसार आहार व उपवास करतो असेहीं त्यांच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान आपल्याला कारागृहात विशेष आदरातिथ्य केले जात असल्याचा आरोपहीं जैन यांनी फेटाळला, ते म्हणाले की कारागृहात माझे वजन 28 किलोने कमी झाले आहे. मग मला विशेष आदरातिथ्य देण्याच्या आरोपात काय तथ्य आहे असा सवाल जैन यांच्यावतीने उपस्थित करण्यात आला. या सुनावणीनंतर जैन यांच्या मागणीचा अर्ज फेटाळण्यात आला.