भिगवण (वार्ताहर) – अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भिगवणच्या उपसरपंचपदी सत्यवान भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच मुमताज जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
त्यामुळे दि. 17 रोजी भिगवण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेमध्ये सत्यवान भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच दीपिका क्षीरसागर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी जाहीर केले.
गेल्या चार वर्षांपासून उपसरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा मात्र या निवडीमुळे हिरमोड झाला असून त्यांच्या पदरी निराशा पडली असल्याचे चित्र आहे.
या निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सत्यवान भोसले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
अंतर्गत गटबाजी उफाळली
भिगवणच्या उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली असली तरी उपसरपंच निवडीपूर्वी स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या गुप्त बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व प्रतिनिधींमध्ये पदावरून अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे समजत आहे. यावरून निरंकुश असलेल्या सत्ताधार्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.