सातारा – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मिळवलेल्या एकतर्फी विजयाचा आनंद पोवई नाका सातारा येथे पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून जल्लोष करत साजरा केला. यावेळी ‘आप’ चे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर, महेश महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली “भारत माता की जय’, “वंदे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीने एकतर्फी विजय मिळवला. या निकालानंतर देशभरात आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून “आप’च्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तद्नंतर वाहनचालकांना साखर आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना सागर भोगावकर म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे गेल्या 10 वर्षात केलेल्या कामगिरीमुळे आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत गरजांवर अधिक भर दिल्यामुळे दिल्लीतील मतदारांनी जातीभेद व्यवस्थेला फाटा देत आम आदमी पार्टीच्या कामाला मते दिली आहेत. भविष्यात आम आदमी पार्टी देशातील सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.