सातारा – सातारा शहरातील रस्त्यातील खड्ड्यांना मुरूमाचा उतारा शोधण्यात आला आहे. खडी, मुरूम आणि रोलिंग अशा तीन टप्प्यातील कामांसाठी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. युध्द पातळीवर राधिका रोड व सदाशिव पेठेतील सेवा रस्त्यांच्या मुरूमीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. सातारा शहरातील तीन प्रमुख व त्यांना जोडणाऱ्या सेवा रस्त्यांची मुसळधार पावसाने दैना झाली आहे.
सातारा शहरात तब्बल 990 मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाच्या तडाख्याने राजपथ कर्मवीर पथासह राधिका रस्त्यांची प्रचंड वाट लागली आहे. गणरायाच्या आगमनाला अवधे चोवीस दिवस उरले असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार सातारा पालिकेचा बांधकाम विभाग कामाला लागला आहे. राधिका थिएटर ते बारटक्के चौक, भोसले मळा ते गंमत जंमत वाईन शॉप, पंताचा गोट ते रविवार पेठ पोलीस चौकी, व सदाशिव पेठेतील पेट्रोल पंप ते मशिद कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर खडीकरणाची कामे रिमझिमत्या पावसात हाती घेण्यात आली. रस्त्यावर खडी त्यावर मुरूम टाकून ते रोलिंग करण्यात येत आहेत. मात्र पावसाच्या पाण्याने मुरूम वाहून जाऊन खडी उघडी पडत आहेत. अन्यथा मुरूम पावसाने भिजून दलदल तयार होण्याच्या घटना घडत आहेत.
सर्किट हाऊसच्या रोडची डाव्या बाजूची साईडपट्टी पूर्णपणे दलदलयुक्त असून तेथील खड्यात पाणी भरल्याने दुचाकी व चार चाकी वाहनांना त्याचा अंदाज येईनासा झाला आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बैठकीत रस्त्यांच्या खड्ड्यांची कोपरखळी बसल्याने सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी गडबडले. नगराध्यक्षा माधवी काम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी तातडीने बांधकाम विभागाची बैठक घेऊन सर्किट हाऊस रस्त्याची पाहणी केली.
पाहणीनंतर अवघ्या चार तासात पावसाने चिखल झाला. काम केल्यानंतर त्याची देखभालच न झाल्याने मुरूमीकरणाचा वीस लाख रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. रस्ते विकास अनुदान निधीचे घाईघाईने वाटप झाले मात्र बजेट मंजुरीचा घोळ अद याप न मिटल्याने वीस लाखाचा खर्च कसा टाकणार हा खरा प्रश्न आहे. जुन्या डीएसआरप्रमाणे या खर्चाला पूर्वीच मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. तब्बल आणखी सहा रस्त्यांना मुरूम कोटिंग देण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्य समन्वयक ट्रान्सपोर्ट विभागाचे शरद साळुंखे व इतर चौदा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. साताऱ्यात मुसळधार असताना काहीच तक्रार नसल्याचे सांगत काही कर्मचारी तळमजल्यावरील क्लब हाऊसमधील कॅरम खेळत असल्याची उदाहरणे आहेत. शास्त्रीय उपपकरणे हाताळण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण नाही. भवानी पेठेतील जुन्या एलआयसीच्या बिल्डिंगची जुनी कंपाउंड भिंत गुरूवारी रात्री पलीकडच्या ओढ्यातच कोसळली. तीन वर्षापूर्वी याच एलआयसी इमारती नजीकच्या जुन्या इमारतीची भिंत पडून बोले मामांसह इतर दोघे जण ठार झाले होते. त्याच सदृश्य प्रकरणात ओढयात भिंत कोसळल्याने सातारकरांच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकला.