संगमनेर – नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना विचारले असता, “बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल, तर कॉंग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे. कॉंग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले आहे.
संगमनेरमध्ये आज निवृत्ती महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने ते बोलत होते. राजकारणातली नेते मंडळी दिशा द्यायचे आणि लोक ऐकायचे. आता जमाना बदलला आहे. लोकांना जे आवडते ते करावे लागते अशी स्थिती आहे. अशात कुणीतरी समाजाला आरसा दाखवला पाहिजे, ते निवृत्ती महाराज करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे नाव मोठे केले, तसेच महाराजही करत आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तक्रारीचे पत्र दिले होते. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाढत असलेला वाद पाहता येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रभारी एच.के. पाटील यांनी कॉंग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीआधीच बाळासाहेब थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच सोपवल्याने आता राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.