सत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार

नवनाथ पाटील
कॉंग्रेसने गमावले निष्ठावंत घराणे

शिराळा – सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसने निष्ठावंत घराणे गमावले. निष्ठा काय असते, याचे उदाहरण स्व. शिवाजीराव देशमुख यांनी सर्वांना दाखवून दिली होती. शिराळा तालुक्‍याने कै. शिवाजीराव देशमुख यांच्या रूपाने राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या काळात अनेक पदे भूषवली. शिराळा तालुक्‍यात कॉंग्रेस घराघरात पोहोचवण्यासाठी देशमुख घराण्यांने अनेक प्रयत्न केलेत. शिराळा तालुका हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु आता सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने शिराळा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस हद्दपार झाली हे मात्र नक्की.

शिराळा तालुक्‍याचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख हे सांगली जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस निष्ठावंत म्हणून परिचित होते. मात्र त्यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेश करुन राजकीय भूकंप घडविला आहे. आजपर्यंत शिराळा तालुक्‍यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसची सत्ता आहे. देशात व राज्यात भाजपाची लाट असतानाही 2017 साली शिराळा पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची पकड ठेवण्यात सत्यजित देशमुख यशस्वी झाले होते. परिणामी शिराळा तालुक्‍यात कॉंग्रेसला अच्छे दिन आणण्यात सत्यजित यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु त्यांच्या नेतृत्वाची जाण राज्यातील कॉंग्रेसमधील नेत्यांनी न ठेवल्यामुळे व शिराळा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिल्यामुळे नाराज होवून सत्यजित यांनी भाजप प्रवेश केला. यांच्या प्रवेशाने शिराळा मतदार संघात भाजपाची ताकद वाढली आहे.

2009 साली विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना सत्यजित यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्या पाठीमागे ताकद उभी करून त्यांना आमदार करावे व 2014 ला मानसिंगराव नाईक यांनी त्यांची ताकद सत्यजित यांच्या पाठीमागे उभी करून त्यांना आमदार करून पैरा फेडावा असे सूत्र ठरले होते. त्यावेळी सत्यजित यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठींबा देवून आमदार केले. परंतु 2014 ला कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीचे मानसिंगराव, कॉंग्रेसचे सत्यजित व भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्यात तिरंगी सामना झाला. त्यात शिवाजीराव नाईक निसटत्या मतांनी विजयी झाले. तद्‌नंतर झालेल्या स्थानिक निवडणुकीकरिता कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करुन शिवाजीराव नाईकांना रोखले. परंतु नेहमीच सत्यजित देशमुख यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते यावेळी मैदानावर येणार या अपेक्षेने तयारीत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे मानसिंगराव यांनी पाठींबा देऊन 2009 चा पैरा फेडावा, ही इच्छा होती.

पण मानसिंगराव नाईक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उभा राहून आमदार होण्याकरिता पूर्ण तयारी केली. परंतु काहीही झाले तरी यावेळी आमदार व्हाययचेच, या तयारीने कॉंग्रेसची तत्वे व निष्ठा बाजूला ठेवून आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सत्यजित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप घडविला. देशमुख गटाला व कार्यकत्यांना ताकद द्यायची असेल तर भाजप प्रवेश हाच पर्याय त्यांच्या पुढे होता.

पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार

सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेश केल्याने 1970 च्या दशकापासून कॉंग्रेस निष्ठावंत म्हणून राहिलेले पश्‍चिम महाराष्ट्रातील देशमुख घराणे ज्येष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या घराण्याप्रमाणे अग्रगन्य म्हणून परिचित आहे. मात्र आघाडी आणि युतीच्या घोळात देशमुख घराण्यांची कॉंग्रेसच्या निष्ठेचा शिवधनुष्य खाली ठेवला. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार हे निश्‍चित आहे. मात्र विधानसभेला विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक की नवखे सत्यजित देशमुख यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार हे मात्र निश्‍चित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.