मुंबई – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत बंडखोरी उमेदवार सत्यजीत तांबे यांचे अखेर कॉंग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सत्यजीत तांबे यांचे वडील आणि आमदार सुधीर तांबे यांनाही निलंबित करण्यात आले होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. कॉंग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.
तांबे परिवाराचं काय झाले याच्याशी आम्हाला आता काही भाष्य करायचे नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे. थोरात साहेब आमचे नेते आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करु. त्यांची काय भूमिका आहे ते पाहू. मात्र सध्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अधिकृतपणे शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक आणि अमरावती पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
महाविकास आघाडीचा कुठे कुणाला पाठिंबा?
नाशिक पदवीधर मतदारसंघ – शुभांगी पाटील
अमरावती पदवीधर मतदारसंघ – धिरज लिंगाडे
नागपूर शिक्षक मतदारसंघ – सुधाकर अडबाले
कोकण शिक्षक मतदारसंघ – बाळाराम पाटील
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – विक्रम काळे
सत्यजीत तांबेंचे मौन
सत्यजीत तांबे यांना महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांचा जोरदार प्रचार मात्र सुरू आहे. सत्यजीत तांबे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणी राहुरी तालुक्यातील शिक्षणसंस्था आणी शिक्षकांसह पदवीधरांच्या भेटीगाठी घेत आहेत.