पाथर्डीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा बैठा सत्याग्रह सुरू

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सुरू करण्याचे व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी 

पाथर्डी  – तालुक्‍यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्‌नम या राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी. दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून नवीन ठेकेदार नेमून रखडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या समोर बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.

सकाळी आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने आंदोलन सुरू आहे. आव्हाड यांच्या समवेत सुनील पाखरे, अविनाश टकले, नवाबभाई शेख, जालिंदर काटे, गणेश आव्हाड, विष्णू सांगळे, अनिल पालवे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना किसन आव्हाड म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून फुंदेटाकळी फाटा ते मेहकरी फाटा दरम्यान सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. झालेले कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अनेक ठिकाणी नवीन झालेला रस्ता उखडून खड्डे पडले आहेत. झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी.

या कामासाठी नवीन ठेकेदाराची नेमणूक होऊन रखडलेले काम सुरु करावे.
या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे काम एक वर्षांपासून बंद असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे निर्माण झाली आहेत. काही प्रमाणात जी रस्त्याची कामे करण्यात आली आहेत त्या रस्त्यावर सुद्धा आता खड्डे पडले आहेत. हा रस्ता धोकादायक झाल्याने विविध अपघातात आत्तापर्यंत 105 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही जणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.

या रस्त्यावर ज्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहेत ते पूल सुद्धा अर्धवट बांधले असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी तसेच हे काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावे. या विषयावर मागे आंदोलन केल्यानंतर हे काम करणाऱ्या ठेकेदाराने एक महिन्यात केवळ येळी येथील पुलावर मुरुमांचा भराव टाकून केवळ काम सुरु असल्याचा देखावा निर्माण केला आहे. या पद्धतीने काम केल्यास या रस्त्याच्या कामाला दहा वर्ष लागतील. तातडीने हे काम सुरु करावे असे निवेदनाच्या शेवटी म्हणण्यात आले असून या मागणीसाठी आज निवेदन देणारे सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रहास बसले असून या आंदोलनाची दखल सायंकाळी उशिरापर्यंत कोणीही न घेतल्याने आंदोलन सुरू होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)