वॉशिंग्टन : सौर मंडलातील शनी या ग्रहाला सर्वात जास्त चंद्र असल्याचा शोध नुकताच लागला होता. आता या शनीचा एक चंद्र अंतराळात पाण्याचे फवारे सोडत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. ‘इन्सिलेड्स’ असे या शनीच्या चंद्राचे नाव असून नासाच्या जेम्स वेब या दुर्बिणीने या पाण्याच्या फवाराची छायाचित्रे घेतली आहेत. अंतराळात कित्येक किलोमीटर अंतरावर हे पाण्याचे फवारे सोडले जात आहेत.
या चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वी बाहेरही जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत शास्त्रज्ञांनी आता नव्याने संशोधन सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. ‘इन्सिलेडस’ नावाचा हा चंद्र ज्या प्रकारचे पाणी बाहेर फेकत आहे. त्यामध्ये काही रासायनिक आणि जैविक कण आहेत यांचा अभ्यास करणे शक्य झाले, तर एक महत्त्वाचे संशोधन पार पडू शकते असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. शनिच्या इन्सिलेडस या चंद्रावर बर्फाचा समुद्र असल्याची शक्यता आहे.
सूर्याच्या तापमानामुळे या बर्फाची वाफ होत आहे आणि या वाफेचेच रूपांतर पाण्यात होत असून तेच पाणी बाहेर फेकले जात असावे असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. सर्वप्रथम 2008 मध्ये शास्त्रज्ञांना अशा प्रकारची छायाचित्रे उपलब्ध झाली होती. त्यानंतर आणखीन संशोधन करण्यात आले असता सतत या चंद्रावरून अंतराळात पाण्याचे फवारे सुटत असल्याचे लक्षात आले. शनिचा इन्सिलेडस हा उपग्रह एक बर्फाळ ग्रह असून तो आपल्या सूर्य मंडळाच्या थोडा बाहेर आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ग्रहावरील बर्फाळ समुद्र हा पृष्ठभूमीवर नसून जमिनीखाली आहे या ग्रहावर जमिनीखाली जो बर्फाळ समुद्र आहे त्या ठिकाणी जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत शास्त्रज्ञांना शंका आहे आणि त्या दिशेने आता संशोधन सुरू करण्यात येत आहे.