गाळेधारकांच्या पुनर्वसनासंबंधात शनिवारी शिक्‍कामोर्तब

महापौर बंगल्यावर खासदार आणि भाजप शहराध्यक्षांबरोबर बैठक

पुणे – महात्मा फुले मंडई येथील फ्रूट मार्केटच्या भागात मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार असून तेथील आणि स्वारगेट येथील गाळेधारकांच्या पुनर्वसनासंबंधात शनिवारी महापौर बंगल्यावर बैठक होणार आहे.

आयुक्‍त सौरभ राव आणि “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांची गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. याला “महामेट्रो’तर्फे प्रकल्प प्रमुख अतुल गाडगीळ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. तर पालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप उपस्थित होते.

“महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी महापालिका आयुक्‍तांपुढे मांडल्या. त्यामध्ये महापौर मुक्‍ता टिळक, भाजप शहराध्यक्षा आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय झाला असून, शनिवारी महापौर बंगल्यावर ही बैठक होणार आहे.

मंडई, स्वारगेट याशिवाय पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुलाजवळील पथारीवाल्यांच्या विरोधामुळे मेट्रोचे काम थांबले आहे. त्यासंबंधीही बैठकीत चर्चा होणार आहे. मंडईतील फळबाजार आणि झुणका भाकर केंद्राच्या जागेचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तसेच स्वारगेट येथे मेट्रो हबसाठी ज्या 106 स्टॉलधारकांचे पुनर्वसन सणसग्राऊंड समोर आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तसेच पाटील प्लाझा समोर केले आहे, त्यांच्यासाठी लाईट आणि पाणी या बेसिक गोष्टी महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही महामेट्रोने केली आहे.

याशिवाय पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुलाजवलील 5 गाळेधारकांचाही प्रश्‍न आहे. त्यांना गाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून देऊन हा प्रश्‍नही त्वरित सोडवावा, अशीही विनंती महामेट्रोतर्फे केली आहे.

मेट्रो हबमध्ये स्टॉलधारकांचे पुनर्वसन शक्‍य नाही
मेट्रो हबमध्ये स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. मात्र, तेथील खर्च या स्टॉलधारकांना परवडणारा नाही. त्यापेक्षा महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आमची असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हबमध्येच त्यांचे पुनर्वसन होणार असे जर कोणी आश्‍वासन दिले असेल तर ते पूर्ण होणार नसल्याचे एकंदरित चित्र आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.