पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत , वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीनही धरणांतून विसर्ग सुरू असून हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.
त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी विसर्ग वाढविण्यात आला असून 16 हजार 247 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत 7.16 टीएमसी इतके पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
मागील 24 तासांत टेमघर धरण क्षेत्रात सर्वाधिक 152 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला-30, पानशेत-119, वरसगाव-122 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पानशेत धरणातून दुपारी 7 हजार 293 क्युसेक विसर्ग सुरू होता. दुपारी हा विसर्ग कमी करून धरणाच्या सांडव्यावरून 4 हजार 758 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 600 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तसेच वरसगाव धरणातून पॉवर हाऊसद्वारे 600 क्युसेक, तर पानशेत धरणातूनही पाॉवर हाऊसद्वारे 50 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
वरील धरणांतून पाणी खडकवासला धरणात येत असल्याने येथून विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणातून नदीमध्ये 16 हजार 247 क्युसेक विसर्ग बुधवारी सायंकाळी करण्यात येत होता. तर कालवाव्याद्वारे शेतीसाठी एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाचे नाव – पाणीसाठा – टक्के
खडकवासला – 1.56 टीएमसी – 83.31
पानशेत – 9.82 टीएमसी – 92.15
वरसगाव – 11.38 टीएमसी -88.78
टेमघर – 3.36 टीएमसी -90.65
एकूण – 26.20 टीएमसी – 89.90