छत्री घेऊन सातारकर बाहेर पडले खरेदीला

भरपावसातही साताऱ्यात वसुबारस उत्साहात
सातारा – वसुबारसेला गाय आणि वासरांची पूजा करून दिवाळीला सुरुवात केली जाते. पंचपाळी हौद ट्रस्टच्यावतीने दरवर्षीप्रमाणे गाय व वासरांच्या सहा जोड्या पूजेसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. भरपावसातही महिलांनी गाय व वासरांची पूजा केली. पाऊस असला तरी दिवाळीनिमित्त खरेदीसाठी सातारकरांनी बाजारात गर्दी केली होती.

पंचपाळी हौद, मंगळवार तळे, धनिणीची बाग, सदर बझार, करंजे या ठिकाणी वसुबारसनिमित्त गाय व वासराची पूजा करण्यात आली. पावसाच्या रिपरिपीमुळे गायी व वासरे पत्र्यांच्या शेडमध्ये
बांधण्यात आली होती. धनत्रयोदशीनिमित्त साताऱ्यात घरोघरी धन्वंतरीची पूजा करण्यात आली. त्यासाठी लागणारे धणे आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती.

तांब्याचे पात्र आणि ताटांच्या खरेदीसाठी नागरिकांनी भांड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. दरम्यान, दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट असून साताऱ्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, पावसाला न जुमानता नागरिक खरेदी करताना दिसत होते. खण आळी आणि व्यापारी पेठांमध्ये गर्दी होती. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांनी तात्पुरते अडथळे उभारले होते. राजपथावर गर्दीमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.