प्रकल्पग्रस्तांचे साताऱ्यात आत्मक्‍लेष आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांच्या विधानाचा धरणग्रस्तांनी केला निषेध
स्पिकर, शौचालय बंद केल्याने संताप

सातारा – कोयनेसह इतर प्रकल्पांच्या धरणग्रस्तांचे जमिनीच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाचा सोमवारी निषेध केला. त्याचबरोबर आंदोलकर्त्यांची गळचेपी करण्याच्या दृष्टीने स्पिकर बंद करण्यासह परिसरातील नळाचे कॉक व शौचालय देखील बंद केल्याने धरणग्रस्तांनी संताप व्यक्त केला.

कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी बनविण्याचे काम शासनाचे आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार झाल्यानंतर कोणकोणत्या जमिनीचे वाटप झाले नाही, याची माहिती शासनाकडे व कायद्याने पुनर्वसन उपसंचालक म्हणून जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे त्यांनी यादी तयार करणे गरजेचे होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रकल्पग्रस्तांकडून जमीन मागणीचे सरसकट अर्ज मागविण्यात आले.

त्यामुळे श्रमिक मुक्ती दलाशी संबधित नसलेल्या बऱ्याच लोकांनी जमीन मागणीचे अर्ज केले. त्यामध्ये सुमारे 7 हजार अर्ज त्यांच्याकडे आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यापैकी फक्त एकच खातेदार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वास्तविक ज्यावेळी गावोगावी संकलन वाचन करण्यात आले. त्यानुसार पाटण तालुक्‍यात 1400 खातेदारांना पूर्ण तर 750 खातेदारांना अंशत: जमिनीचे वाटप बाकी असल्याची माहिती तपासणीत पुढे असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. तसेच अद्याप महाबळेश्‍वर व जावली तालुक्‍यातील आकडे येणे बाकी आहे. असे असताना शासन यंत्रणेने केलेल्या कामाची कोणतीही माहिती न घेता त्यांनी कोयना धरणग्रस्तांनी खोटारडे व चोर ठरविणारे वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

तसेच मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू असताना प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक आयोजित करण्यासाठी दोन वेळा पत्र देण्यात आले. परंतु अद्याप त्यांनी काहीही केले नाही. उलट पोलिसांना सांगून आंदोलनाचे ठिकाण बदलण्यासाठी तसेच स्पिकर बंद करणे, जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील पाण्याचे नळ व शौचालय बंद करण्यात आले आहेत.

त्यामुळे आंदोलनकर्त्यांना नाईलाजाने उघड्यावर शौचास जाणे भाग पडत आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते एक दिवसाचे उपोषण करून आत्मक्‍लेष करित आहेत, असे डॉ.प्रशांत पन्हाळकर यांनी सांगितले. यावेळी चैतन्य दळवी, ऍड. शरद जांभळे, प्रकाश भातुसे, आनंदा सपकाळ, साहेबराव शिंदे, संदिप काटे, मोहन धनवे, श्रीकांत राजेशिर्के, शंकरराव चव्हाण, गोपाळराव शिर्के आदी उपस्थित होते.

धरणग्रस्तांनी ज्या विकासासाठी स्वत:ची घरे पाण्यात बुडवली. मात्र, जिल्हाधिकारीच धरणग्रस्तांशी अशा प्रकारे वागणार असतील तर आमच्यापुढे आत्मक्‍लेष करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे धरणग्रस्तांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे असलेली जबाबदारी ओळखून पदाला शोभेल असे वक्तव्य करावे, अशी मागणी डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.