महामार्ग दुरुस्तीसाठी सातारकरांनी एकजूट दाखविण्याची गरज

आंदोलनाचा फार्स; दोन तासांच्या टोलबंदीने काय मिळाले?

सातारा  – सातारा-पुणे महामार्गाची दुरुस्ती तातडीने न झाल्यास टोलवसुली बंद पाडू, अशी भीमगर्जना वारंवार करणाऱ्या आ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी टोल नाक्‍यावर आज करण्यात आलेले आंदोलन केवळ फार्स ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

केवळ दोन तास टोल नाका बंद करून त्यानंतर टोलवसुली पुन्हा सुरू झाली. सर्वसामान्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने या दोन तासांच्या टोल बंदीने सातारकरांना नक्‍की काय मिळाले? केवळ खड्डे बुजवण्याचे आश्‍वासन पदरात पाडून घ्यायचे होते तर आंदोलनाचा फार्स कशासाठी केला, असे सवाल उपस्थित होत आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आवश्‍यक सोयीसुविधा मिळाव्यात आणि सातारा-पुणे रस्त्यावरील खड्डे बुजवून दर्जेदार काम होण्यासाठी सातारकरांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे.

सातारा-पुणे मार्गावरील प्रवास म्हणजे मृत्यूला चकवा देण्यासारखे आहे. सातारकरांचा टोलमुक्तीचा अजेंडा आत्ताचा नाही. टोलमुक्तीसाठी सातारकर कायम आपल्यापरीने प्रयत्न करत आले आहेत. मात्र, त्यावेळी त्यांना ज्या लोकप्रतिनिधींची साथ मिळायला हवी होती, ती मिळाली नसल्याची खंत सातारकरांना आहे. साताऱ्यातील दोन्ही राजांना जनता देवासमान मानते. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकते. म्हणूनच त्यांना जाब विचारण्याचा अधिकारही जनतेला आहे.

अनेकांच्या गाड्यांचे टायर्स भंगारात गेले, अनेकांचे मणके कायमचे कामातून गेले. त्यानंतर सातारकरांनी टोलमुक्‍तीसाठी एक पाऊल पुढे टाकत सोशल मीडियावर मोहीम चालवली. त्यांनी निवेदन देताच माजी खासदार उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अल्टिमेटम दिला होता. महामार्गावरील खड्डे बुजवा आणि सुविधा पुरवा अन्यथा टोल बंद करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी दिलेली
मुदत संपली तरी महामार्गावरील स्थिती “जैसे थे’ असल्यानंतर दोन्ही राजे कोणती भूमिका घेणार, असा प्रश्‍न सातारकर विचारत होते.

इतकेच काय “टोल बंद’चा इशाऱ्यामुळे लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व आमदार समर्थकांची बैठक झाली. त्यात प्राधिकरणाने महामार्ग दुरुस्तीसाठी मुदत मागितली होती. मात्र, आमदार व त्यांच्या समर्थकांनी मुदत देण्यास नकार देऊन बुधवारी आनेवाडी टोल नाक्‍यावर आंदोलन केले.

दोन तासांच्या टोलबंदीनंतर प्राधिकरणाने खड्डे व इतर दुरुस्ती 15 जानेवारीपर्यंत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही त्यांनी मुदत मागितली होती. त्यामुळे आंदोलनाची आवश्‍यकता का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर विश्‍वास नसल्याचे आ. शिवेंद्रसिहराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मग, दोन तासांच्या टोलबंदीने सातारकरांना काय मिळाले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.