सतीश भांगरे शिवसेनेतच

अकोले – अकोले तालुक्‍यात राजकीय वातावरण घुसळून निघत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपमय झाल्याने शिवसेना नेते सतीश भांगरे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला त्यांनी आज विराम दिला. आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

2014 साली कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणारे सतीश भांगरे त्यांनी त्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गेले चार वर्षे शिवसेनेमध्ये ते कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारचा संपर्क ठेवून आहेत. त्यांनी पक्षबांधणीस हातभार लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे सुपुत्र वैभवराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सतीश भांगरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा अशाप्रकारची आग्रही भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतले होती. त्यादृष्टीने त्यांच्या समर्थकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्कही साधला. पक्ष प्रवेशासाठी हालचाल केली.

या दरम्यान मातोश्रीवरून भांगरे यांना पक्ष सोडू नये. पक्षातच रहावे.अशा आशयाचा निरोप आला. त्यामुळे अकोले विधानसभा मतदार संघाची निवडणूक शिवसेना लढवणार काय? असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत छेडले असता भांगरे म्हणाले की, आपण मातोश्रीच्या निरोपाप्रमाणे पक्षातच राहणार असून शिवसेना सोडण्याचा कोणताही विचार आपल्या मनामध्ये सुरू नाही. भविष्यकाळात नेमके राजकारण कोणते वळण घेणार हे आज सांगता येणार नाही, असे सूचक विधान करून आपण व आपले सहकारी शिवसेनेतच राहणार आहोत असा निर्वाळा त्यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.