तिरुवनंतपुरम: कोरोनाचा पहिला रुग्ण ज्या राज्यात सापडला त्या केरळमध्ये आज 100 दिवसानंतर आता केवळ एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले आणखी दहा जण काल बरे झाले असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 503 एकूण कोरोनाबाधित आढळले असून आता केवळ 16 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात सुमारे 97 टक्के कोरोनाबाधित बरे झाले असून त्यापैकी चार जण कोरोनामुळे मरण पावले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. केरळ राज्यात एका महिन्यापूर्वी 300 कोरोना केसेस होत्या. गेल्या बुधवारी कोरोना संक्रमितांची संख्या 30 वर आली होती. काही आठवड्यांपूर्वी राज्यात 100 हून अधिक हॉटस्पॉट होते तर आता केवळ 33 हॉटस्पॉट आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केरळमधील एरनाकुलम जिल्ह्यातील एकमेव नवीन रुग्ण सापडला आहे. त्याचा तामिळनाडूमधील चेन्नई इथून प्रवासाचा इतिहास आहे, असे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले. केरळच्या त्रिशूर येथे भारतातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तो रुग्ण सापडल्यापासून कालचा 100 वा दिवस होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये विदेशातून आलेल्या लोकांमुळं कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मात्र दोन महिन्यानंतर आम्ही कोरोना नियंत्रणात आणला आहे, असे विजयन म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात 20,157 लोक निरीक्षणाखाली आहेत, त्यातील 347 रुग्णालयात आहेत. राज्यात आतापर्यंत 35,856 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 35,355 कोविड -19 साठी निगेटिव्ह आले आहेत, असे मुख्यमत्री विजयन यांनी सांगितले.