समाधानकारक! लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी मात्र…

देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातच;प्रशासन अलर्ट

मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी राज्यात लसीकरणाचा वेगही देशात सर्वाधिक आहे. येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ते आज विभागीय आयुक्तांशी ऑनलाईन पद्धतीने लसीकरणा संदर्भात बैठकीत बोलत होते. दरम्यान, असे असले तरी देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातच पहायला मिळत आहे.

राज्यात 134 खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र, दर दिवशी 3 लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.

कोविड लसीकरणात आज 18 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वल स्थानी आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून 36 लाख 3 हजार 424 डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान 36 लाख 84 हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते. कालच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरण प्रमाण चांगले आहे असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे असले तरी दिवसाला 3 लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

राज्यात लसीकरण वेगाने होत असले तरी कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत होती. त्याच वेगाने मार्चमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यात पुणे, नागपूर, नाशिकमध्ये तर कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंताजनक म्हणजे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढत होती. सध्या असे कुठलेही कडक निर्बंध नसताना ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.