समाधानकारक! आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार

युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे, असे युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणे या गोष्टी आता बंद होणार आहेत. या कारणांसाठीही आता आधार बंधनकारक नसणार असल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे.

देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना UIDAI चा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. या आधी अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवले जायचे. कोरोना रुग्णाना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार आणि औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता UIDAI च्या स्पष्टीकरणामुळे या गोष्टीवर पडदा पडला आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हते. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना भरती करुन घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच गेली चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार वा UIDAI कडून आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.