राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्रअण्णा माळवदकर यांनी उलगडलेले प्रशांत जगताप यांचे चौफेर व्यक्तीमत्व…
पुण्याचे महापौरपद भूषविलेले प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असतानाची गोष्ट. त्यांच्या कार्याची धडाडी, कामाचा झपाटा आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून त्यांना पीएमटीचा सदस्य होण्याची संधी देण्याची विनंती मी अजित पवार यांना केली होती. अजित पवार यांनी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून प्रशांत जगताप यांना ती संधी दिली आणि त्या संधीचं जगताप यांनी केवळ सोनं केलं असं नाही, तर त्यातून पक्षाला एक सक्षम कणखर आणि धडाडीचा नेता स्वतःच्या व्यक्तीमत्वाच्या माध्यमातून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली, याचा मला अत्यंत अभिमान वाटतो.
वीस-बावीस वर्षांपूर्वी पक्षाच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्याशी माझा परिचय झाला. त्यांच्या गणपतीच्या आरती पासून सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा प्रमुख पाहुणे म्हणून सातत्याने ते मला बोलवत असतात. वानवडीतील पारंपारिक पाटील घराण्यातले असलेले प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेल्या कामांच्या माध्यमातून लोकशाहीतील आपली पाटीलकी सिद्ध केली आहे. लोकशाहीमध्ये पारंपारिक पाटीलकीला स्थान नसून कार्याच्या माध्यमातून सिद्ध होणारी पाटीलकीच महत्त्वाची मानली जाते.
सर्वसामान्य जनतेसाठी काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून येत पुण्याचे महापौर पद भूषविलेल्या प्रशांत जगताप यांनी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुण्यातील सामान्य जनतेला आपलेसे केले. अर्थातच यासाठी त्यांनी झपाटून कष्ट केले. लहानपणापासून असलेला त्यांचा कष्टाळू स्वभाव महापौर पदाच्या कारकिर्दीत देखील त्यांना उपयोगी पडला. कारण शहराचा प्रमुख म्हणून हे मिळालेले हे पद केवळ कार्यक्रमांना मिरवण्यासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही महत्त्वाची जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिले.
त्यांच्या अगदी सुरुवातीच्या 90 टक्के सामाजिक, राजकीय कामांचा आणि कार्यक्रमांचा प्रमुख पाहुणा या नात्याने मी साक्षीदार असल्यामुळे त्यांच्या कामाचा झपाटा मी जवळून अनुभवलेला आहे. मग त्यांनी एसआरपीएफ ग्राऊंड मध्ये भरवलेले खेळाचे सामने असो, त्यांनी आयोजित केलेले मोठे सांस्कृतिक उपक्रम असो, एड्स सारख्या आजारा संदर्भात राबविलेले आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम असो किंवा सर्वसामान्यांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना दिलेले महत्त्व असो या सगळ्यातून प्रशांत जगताप या अष्टपैलू नेत्याचाच प्रत्यय मला आला आहे. वानवडी गावात भरत असलेल्या काळूबाईच्या छोट्याशा यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविकांना ते आपल्या घरी बोलवायचे आणि मोठ्या प्रमाणावर प्रसादाचे वाटप करून सगळ्यांच्या सदिच्छा त्यांनी मिळवल्या, हे मी स्वतः अनुभवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यातील एक विश्वासू नेते म्हणून प्रशांत जगताप यांचे नाव पक्षामध्ये आदराने आणि विश्वासाने घेतले जाते. कोणतेही काम किंवा कोणताही कार्यक्रम हा लहान आहे की मोठा हे न पाहता ते परिपूर्ण करण्यासाठी स्वतःला सर्वार्थाने झोकून देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पीएमटीचा राष्ट्रवादी पक्षाचा एक सदस्य निवडून द्यायचा होता, त्यावेळी संसदीय मंडळाचा मी सभासद होतो आणि त्याच्या बैठकीत अजित पवार यांना मी प्रशांत जगताप यांचे नाव सुचवले होते. त्यावेळी प्रशांत जगताप हे पक्षाचे तुलनेने छोटे मात्र अतिशय सक्रिय असे कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या जोरावर पक्षाचे एक ते दीड हजार सदस्य नव्याने जोडले होते. पक्षासाठी झटून कार्य करणाऱ्या, पक्ष मोठा करण्यासाठी नवे सदस्य जोडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीला आपण संधी दिली पाहिजे, अशी माझी भूमिका मी अजित पवार यांच्यापुढे ठेवली.
माझ्या या शब्दांचा मान राखत अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तो दिवस आजही मला खरा आनंद आणि समाधान देऊन जातो. या पदापासून सुरु झालेला प्रशांत जगताप यांचा प्रवास राजकारणात नव्याने येऊ पाहणाऱ्या नव्या उमेदीच्या तरुणांपुढे आदर्श ठरावा असाच आहे. सुरुवातीला त्यांच्या आई निवडून आल्या आणि त्यानंतर स्वतः ते निवडून येऊन पुण्याच्या महापौर पदापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला. राजकारणामध्ये एखादी संधी मिळणे हे जसे अवघड असते तसेच मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे वापर करून सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून चिकाटीने स्वतःला सिद्ध करणे हे देखील तितकेच अवघड असते. प्रशांत जगताप यांनी त्यांना मिळालेल्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून आपल्या पदाची शान राखली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की, जनतेसाठी झोकून देऊन काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि स्थानिक नेत्याला देखील पाठबळ देण्याचे काम पक्षप्रमुख आणि पक्षश्रेष्ठी सातत्याने करीत असतात. प्रशांत जगताप यांना देखील पक्ष प्रमुखांसह पक्षश्रेष्ठींनी विविध मार्गांनी बळ देण्याचे काम केले. प्रशांत जगताप यांच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, मात्र अचानक ठरलेल्या एका परदेशी दौऱ्यामुळे त्यांना त्या कार्यक्रमाला येणे शक्य होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या एका तरुण नेत्याचा हिरमोड होऊ नये म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार मंत्र्यांना त्या कार्यक्रमासाठी पाठवून प्रशांत जगताप यांचा उत्साह व्दिगुणीत करण्याचे काम केले. पवार कुटुंबियांचे वैशिष्ट्य हे आहे की, ते कधीच आपल्या कार्यकर्त्याला एकटे पडू देत नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ देत नाहीत.
पक्षप्रमुख आणि श्रेष्ठींच्या या विश्वासाला पात्र ठरत प्रशांत जगताप आजही दिवस-रात्र पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे कार्य करीत आहेत. सामान्यातील सामान्याला सामान्य कार्यकर्त्याला विश्वासाचे बळ देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसा प्रशांत जगताप खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. मुख्य म्हणजे राजकीय सत्तेची पदाची कोणतीही हवा डोक्यात जाऊ न देता प्रशांत जगताप यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंबीय अतिशय नम्रपणे सगळ्यांच्या संपर्कात राहतात. जनतेचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता त्या प्रश्नांना आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी कार्य करणाऱ्या प्रशांत जगताप यांनी पुण्यातील मूलभूत प्रश्नांकडे भविष्यात अधिकाधिक लक्ष घालावे, अशी माझी अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पक्षाला सुमारे वीस-बावीस वर्षांनंतर जे टोलेजंग कार्यालय मिळवून दिले, ही आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांसाठी अतिशय अभिमानास्पद कामगिरी आहे, असे मला वाटते या कार्यालयामुळे पक्ष वाढीला अधिक चालना मिळते आहे. भविष्यात पुण्याच्या सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या धडाडीच्या, चौफेर आणि क्रियाशील व्यक्तिमत्त्वाचा नक्कीच उपयोग होईल, याची मला खात्री आहे.