पुणे – डिजिटल सातबारा वितरीत करण्याचे अधिकार तलाठ्यांबरोबरच आता तालुकास्तरावरील नायब तहसीलदारांनासुद्धा देण्यात आले आहेत. या अधिकारामुळे तहसीलदार कार्यालयात एखाद्या व्यक्तीस 7/12 उताऱ्याची आवश्यकता भासल्यास सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. शासकीय कामासाठी सातबारा उताऱ्याची गरज भासल्यास नागरिकांना सुद्धा तत्काळ सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व गावांमधील सातबारे उतारे तहसीलदार कार्यालयात मिळणार आहेत.
सातबारा उतारा हा संबंधित गावाच्या तलाठी यांच्या स्वाक्षरीनेच देण्यात येतो. त्यामुळे सातबारा उतारा घेण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागते. विविध कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात जावे लागते. शासकीय कामकाजासाठी अधिकाऱ्यांनासुद्धा सातबारा उतारा आवश्यक असतो. अशावेळी तलाठ्यांकडून सातबारा उतारा मागविण्यात येतो. आता तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागाचे नायब तहसीलदारांना सुद्धा सातबारा उतारा वितरीत करण्याचे अधिकार दिल्याने नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
आयडी व पासवर्ड दिले
आपले सरकार या संकेतस्थळावरून वितरीत करण्यात येणाऱ्या डिजिटल सातबारा उताऱ्यामध्ये सुसूत्रता राहण्याच्या दृष्टीने तसेच तांत्रिक अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने सातबारा उतारे तालुक्यातील एका अधिकाऱ्याकडून डिजिटल स्वाक्षरी करून वितरीत करणे गरजेचे होते. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी नायब तहसीलदार यांना आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डिजिटल सातबारा उतारा वितरीत करण्याचे अधिकार तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारांना सुद्धा देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तालुक्यातील सर्व गावांमधील सातबारे उतारे मिळणे शक्य होणार आहे. नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी