प्रागच्या थिएटरमध्ये सातारी लावणीचा दणका

साताऱ्याच्या वैशाली राजेघाटगे व सख्यांच्या नृत्याला द्वितीय क्रमांक

सातारा – फर्मास लावणीची मोहक अदा आणि तालावर थिरकणारी लयबध्द पावले मात्र संदेश “बेटी बचाव, बेटी बढाव’चा. साताऱ्याच्या लेकींनी न्यू प्राग डान्स फेस्टिव्हलमध्ये असा काही नृत्याचा जलवा रंगवला की प्रागवासीय महाराष्ट्राच्या अस्सल लावणीवर फिदा झाले.
साताऱ्याच्या सक्षम अकादमीच्या वतीने वैशाली राजेघाटगे आणि त्यांच्या बारा सख्यांनी मानाच्या नृत्य स्पर्धामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. युरोपमधील रंगमंचावर अभिजात शास्त्रीय नृत्य अस्सल महाराष्ट्रीय जोगवा व लावणीने भारतीय संस्कृतीची छाप पाडली. या महोत्सवात तब्बल पंचवीस देशाचे दोनशे नर्तक सहभागी झाले होते.

सात जुलैला इटलीची राजधानी असणाऱ्या प्राग शहरात युरोपच्या नॅशनल थिएटरवर जागतिक पातळीवरचा लोककलांचा रंगारंग सोहळा रंगला. इंडियन नॅशनल थिएटरच्या सदस्या असणाऱ्या वैशाली राजेघाटगे यांनी महिला सक्षमीकरण व मुलगी वाचवा असे सामाजिक संदेश देणारे दोन नृत्यप्रकार महोत्सवासाठी पाठवले होते. लावणी आणि जोगवा या महाराष्ट्रीय परंपराचे यथार्थ दर्शन प्रागवासियांना झाले. राजेघाटगे यांच्या सक्षम ग्रुपमध्ये नृत्यदिग्दर्शिका वैशाली राजेघाटगे यांच्यासह विध्दी मुंदडा, शलाका निकम, समृद्धी शहा, शीतल लांडगे, प्रज्ञा चव्हाण, काजल निकम, दीपा गोवनकर, सुनीता राजेघाटगे सहभागी झाले होते.

भारतीय प्रेक्षक नसतानाही जोगवा परंपरेतून व्यक्त झालेला महिला सक्षमीकरणाचा व्यक्त झालेला संदेश परीक्षकांना भावला. भाषेची अडचण नव्हती पण नृत्यातल्या भावमुद्रांनी भारतीय स्त्रीच्या अस्मितेचे रूप लोभसपणे प्रकट झाले. मोहक अदांची लावण्यखणी लावणी सादरीकरणाचा यूएसपी ठरली. “मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा,’ या लावणीवर प्रागच्या प्रेक्षकांनी सुध्दा भाषेचे बंधन बाजूला करून ठेका धरला.

प्रागच्या नॅशनल स्टेडियमने आणि परीक्षकांनी हे अभूतपूर्व दृश्‍य आपल्या डोळ्यांनी पाहिले. मुलगी हीसुद्धा वंशाचा दिवा असत,े मुलगी वाचवा हे सांगणारी ही लावणी परीक्षकांच्या मनात घर करून गेली. चीन, हॉगकॉग, ब्राझील, रशिया, टर्की, बांगला देश, अमेरिका, पनामा, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम आदी पंचवीस देशाचे तब्बल त्रेपन्न डान्स झाले. त्यामधून निवडक पंधरा नृत्यांना अंतिम फेरीसाठी बोलावण्यात आले. आणि दोनशे स्पर्धकातून साताऱ्याच्या सखींनी चक्क दुसऱ्या क्रमांकाचे शील्ड खेचून आणले. दक्षिण आफ्रिकेचे गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांना अभिवादन करणारे आफ्रिकन सदस्यांचे हिप हॉप नृत्य पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. साताऱ्याच्या लेकींनी गाजवलेल्या पराक्रमाने साताऱ्याच्या गुणवत्तेची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)