वाहतूक कोंडीमुळे साताऱ्याचा जीव गुदमरला

ग्रेड सेपरेटरच्या कामासह पूल खचल्याचा परिणाम

तूर्त वाहतूक नियंत्रणच गरजेचे

ग्रेड सेपरेटर आणि आता पूल खचण्याच्या घटनेमुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अशा स्थितीत वाहतूक शाखेला सहाय्य म्हणून होम गार्डची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील वाहतूक कोंडी कमी होत नाही. एवढेच नव्हे तर राधिका रोड ते जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावर अनेक वेळा रुग्णवाहिका वाहतूक कोंडी अडकल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यावरच वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे.

सातारा – साताऱ्यात वाहतूक नियंत्रणाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे काम आणि आता कै. संजय शिंदे पोलीस चौकीनजिक पूल खचल्याने वळवलेली वाहतूक. त्याचा मोठा ताण पर्यायी मार्गावर येत असून शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलीस विभागाकडून कोणतेही नियोजन होताना दिसून येत नाही. परिणामी वाहतुकदारांसह पादचारी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पोवई नाक्‍यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्या ठिकाणी सव्वा वर्षापूर्वी ग्रेड सेपरेटरच्या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. सद्यःस्थितीत ग्रेड सेप्रेटरचे काम काही प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील सध्या पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी सुरूच आहे. विशेषत: राधिका रोड, एस. टी. स्टॅंड ते जिल्हा शासकीय रूग्णालय, पोवई नाका ते सेंट पॉल स्कूल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका ते हॉटेल बीग बाईट ते मोनार्क चौक, जिल्हा परिषद चौक, रविवार पेठेतील पर्यायी मार्गासह अन्य मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
अशा स्थितीत दोन दिवसांपूर्वी जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावरील व कै. संजय शिंदे पोलीस चौकीसमोरील कालव्यावरचा पूल खचला आहे. त्यामुळे त्या मार्गावरील जाणारी व येणारी वाहतूक बंद करून वळविण्यात आली आहे. जुना आरटीओ चौक- रिमांड होम- सुमित्राराजे उद्यान- झेडपी चौक ते महामार्ग या मार्गावर ताण आला आहे.

परिणामी पर्यायी मार्गावर आणि आता चक्क जिल्हा शासकीय रूग्णालयानजिक चर्च चौकात देखील वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रेड सेपरेटर आणि खचलेल्या पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी होत राहणार आहे. मात्र, कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीसांकडून कोणतेही नियोजन होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूकदारांसह पादचारी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

साताऱ्यात वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पूल खचण्याच्या घटनेमुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण येत आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्याची जबाबदारी पार पाडण्यात येत आहे. परंतु शहरात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्या त्या ठिकाणी तात्काळ कर्मचारी नेमण्यात येतील.

– सुरेश घाडगे  , पोलीस निरीक्षक – वाहतूक शाखा 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)