Satara ZP Election – सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद गटांमध्ये ओबीसी महिलांमध्ये रस्सीखेच होणार असून राष्ट्रवादी सत्ता टिकवणार की भाजप सत्ता काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात या पदासाठी रस्सीखेच असून निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीवरच अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे व गटाकडे जाइल हे स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, जससिंगराव फरांदे, ज्योती जाधव, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर, सुभाष नरळे, हेमलता ननावरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, उदय कबुले यांच्यासह अनेकांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकालात कामाचा ठसा उमटवला. अनेकांना आरक्षणामुळे या पदावर काम करण्याची संधी मिळाली. यावर्षीही पुढील पाच वर्षासाठी ओबीसी महिलेला अध्यक्षपदाची आरक्षणाने संधी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सातारा जिल्हा परिषदेवर १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. सध्य परिस्थितीत केंद्रात भाजप व राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीची (अजित पवार गट) सत्ता आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी आता तशी परिस्थिती दिसून येत नाही. राष्ट्रवादीतील दुफळीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची घौडदौड ना. मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची धुरा प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर असली तरी अद्याप पक्षाला उभारी देण्यात त्यांना यश आले नाही.याउलट जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला शह देत भाजपने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. Satara ZP Election ना. जयकुमार गोरे यांनी तर मिशन जिल्हा परिषद सुरु करुन भाजपचीच सत्ता येणार असे ठासून सांगितले आहे. राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी जातीयवादी शक्तींना रोखत यशवंत विचारा जोपासा, असे आवाहन करत जिल्हा परिषदेची सत्ता अबाधित ठेवण्याबाबत जिल्ह्यातील नेतेमंडळींना कानमंत्र दिला आहे. भाजपने स्वबळावर निवडणुका लढवत मकरंद पाटील व पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केल्याने महायुतीत सध्या बिघाडी झाली आहे. मकरंद पाटील, नितीन पाटील, शंभूराज देसाई, रामराजे ना. निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी एकत्र येत भाजपला शह देण्याची जोरदार तयारी केली आहे. अध्यक्षपद खेचण्यासाठी नेत्यांमध्येच चढाओढ सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आल्यास आरक्षित नऊ मतदारसंघातील विजयी होणाऱ्या ओबीसी महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात औंध या गटातून भाजपकडून भारती गोरे व राष्ट्रवादीकडून मनिषा फडतरे, बुध गटात प्रीती त्रिपुटे (भाजप), लता कर्णे (राष्ट्रवादी), वाठारस्टेशन गटात जयश्री भोसले (राष्ट्रवादी), सुनिता मोहिते (शिवसेना), कुडाळ गटात जयश्री गिरी (भाजप), पूनम नायकवडी (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष), कोडोली गटात नीता खरात (भाजप), कांचन साळुंखे (राष्ट्रवादी), मारुल हवेली गटात प्राची फुटाणे, वैशाली गुरव (भाजप), योगिता गिरी (शिवसेना), मल्हारपेठ गटात भाग्यश्री हिरवे, सुजाता कुंभार (भाजप), विजय कुंभार, कोमल सपकाळ (शिवसेना), विंग गटात शैलजा शिंदे (भाजप), आराधना काटू व अनुराधा बंडगर (राष्ट्रवादी), काले गटात मनिषा पाटील (भाजप), डॉ. माधुरी पावणे, स्वप्नाली पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होणार आहे. दि. २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून कोण कोण माघार घेणार यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, मकरंद पाटील या राज्य सरकारमधील चार मंत्र्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चढाओढ दिसून येत आहे. या गटातील महिला होणार जिल्हा परिषदेची अध्यक्ष -खटाव : बुध व औंध -सातारा: कोडोली -कोरेगाव : वाठार स्टेशन -जावली : कुडाळ -पाटण : मल्हारपेठ, मारुल हवेली -कराड : विंग व काले