Satara ZP Election 2026 – निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचार्यांनी आपले काम निष्पक्षपाती, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करावे. ईव्हीएम मशीन सील करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडून, आपण केलेल्या कामाचे रेकॉर्ड अचूक ठेवल्यास तक्रारीला वाव राहणार नाही, असा सल्ला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, नायब तहसीलदार महेश उबारे, हेमंत बेसके, उपअभियंता अजिंक्य पाटील, व्यवस्थापन व मीडिया विभागप्रमुख अक्षय सपाटे, शिवराज माळी, स्वप्निल नलवडे उपस्थित होते. संतोष पाटील यांनी अतुल म्हेत्रे यांच्या कामाचे कौतुक केले.अतुल म्हेत्रे म्हणाले, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान यंत्रांची काळजी घ्या. कोणीही मतदान कक्ष सोडून बाहेर जाऊ नये. दुसर्या दिवशीचा गोंधळ कमी करण्यासाठी आदल्या दिवशी आवश्यक फॉर्म्स भरून घ्या. मॉक पोल वेळेत संपवून, मशीन मतदानासाठी तयार ठेवा. मशीनमध्ये एरर आल्यास सेक्टर अधिकार्यांशी संपर्क साधा. सातारा जिल्हा परिषद केंद्राध्यक्षांची जबाबदारी, मतदान यंत्रे जोडणी, केबलबाबत घ्यायची काळजी, आदल्या दिवशी करायच्या बाबी, मतदान अधिकार्यांची कर्तव्ये व कामे याविषयी म्हेत्रे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सचित्र माहिती दिली. दरम्यान, शिवाजी विद्यालयात अधिकारी व कर्मचार्यांनी मशीन हाताळण्याच्या प्रशिक्षणासह मॉक पोलही घेतले. प्रशिक्षणार्थींची बहुपर्यायी लेखी चाचणी घेण्यात आली. आनंददायी कामकाजाचा कानमंत्र जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्यांना आनंददायी कामकाज करण्याचा कानमंत्र दिला. निवडणुकीसाठी दिलेल्या वाहनातूनच प्रवास करा. कर्तव्यावर असताना कोणाचाही पाहुणचार घेऊ नका. केंद्र सोडून जाणे टाळा. नोंदवही अचूक नोंदवा. म्हेत्रे यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे तुम्ही आत्मविश्वासाने काम करणार, यात शंका नाही, असे ते म्हणाले.