राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात
सातारा – राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी मंत्रालयात झाली. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांची नावे चर्चेत आहेत.
पुणे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, परभणीसह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटोळे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदींनुसार आरक्षण सोडत काढण्यात आली.
आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले.
राज्यातील जिल्हा परिषदांचे आरक्षण
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदूरबार, हिंगोली अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा खुला प्रवर्ग (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर