महाबळेश्वर : येथील ब्रह्मा ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल ली-मेरिडियनमधील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून करण्यात आलेले कामबंद आंदोलन यशस्वी झाले. युनियनचे संस्थापक आमदार शशिकांत शिंदे स्वतः आंदोलनात सहभागी झाल्याने या आंदोलनाचा हॉटेल व्यवस्थापनाला फटका बसला. हॉटेल व्यवस्थापनाने चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा निर्णय घेतला असून पुण्यात 22 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
महाबळेश्वर येथील ब्रह्मा ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल ली-मेरिडियन राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून हॉटेलमधील सर्व कामगारांना सेवेत कायम करणे, सर्व कामगारांच्या वेतना मध्ये शंभर टक्के वाढ करण्यात यावी, दोन वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे, कायद्यानुसार देय असलेल्या सर्व सुविधा कामगारांना मिळाव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना हॉटेल व्यवसायात हक्काचा रोजगार मिळावा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांसाठी कामगार युनियनने कामबंद आंदोलन पुकारले होते.
आमदार शशिकांत शिंदे, युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गोळे, हॉटेल युनीटचे प्रमुख हेमंत दानवले , समीर झोरे यांच्यासह कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.
शेवटी व्यवस्थापनाने चर्चेद्वारे मार्ग काढण्यात निर्णय घेतला. आता पुण्यात 22 जानेवारीला महत्वपूर्ण बैठक होऊन त्यात निर्णय होणार असल्याचे गोळे यांनी सांगितले.