सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महिलेला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवार, दि. 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. 21) अटक केली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने खंडणीचा आरोप फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित महिलेला न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. अटक करण्यात आलेल्या माहिलेसोबत इतर कोणाचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. या प्रकरणात फोन कॉलमधील आवाजाची पडताळणी करायची आहे.
संशयित महिलेच्या आवाजाचे व स्वाक्षरीचे नमुने तज्ज्ञांकडून तपासून घ्यायचे आहेत. त्यामुळे संशयित महिलेला पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने करण्यात आला. पोलिसांची मागणी मंजूर करताना, न्यायालयाने संशयित महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयित महिलेच्यावतीने काम पाहणारे वकील नितीन गोडसे यांनी तिच्यावर केलेले आरोप फेटाळले. या महिलेला अडकवण्यासाठी हे सर्व जाणूनबुजून करण्यात आले आहे. या महिलेला आधीच्या वकिलांनी फसवले. या महिलेने पैशांना हात लावलेला नाही, असा युक्तिवाद अॅड. गोडसे यांनी केला.