सातारा: कास तलावातील पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरणार

पाणीपुरवठा समिती सभापती सीता हादगे यांनी केली पाहणी

सातारा – कास जलाशयात 15 जूनपर्यंत पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा पाण्याची स्थिती चांगली असली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती सौ. सीता हादगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

गतवर्षी एप्रिल महिन्यात कासची पाणी पातळी अत्यंत खालावल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समिती सभापती सौ. सीता हादगे, कर्मचारी संदीप सावंत, पाटकरी जयराम किर्दत यांनी कास तलावाची पाहणी केली. याबाबत सौ. हादगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गतवर्षी याच दिवशी कास जलाशयाची पाणीपातळी 10.50 फूट होती.

तलावातील मृत पाणीसाठा अधिक असल्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली होती. सद्य स्थितीत तलावाची पाणीपातळी 12 फूट पाणी असल्याने, 15 जूनपर्यंत शहरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही.

सध्या असलेला कडक उन्हाळा, पाण्याचे बाष्पीभवन विचारात घेतले तरी हे पाणी 15 जूनपर्यंत सहज पुरेल, असा विश्वास हादगे यांनी व्यक्त केला. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. नळ सुरू ठेवणे, घरगुती वापरासाठी आणलेल्या पाण्याच्या टाक्‍या ओसंडून वाहणे असे प्रकार होत आहेत.

ज्या भागात पहाटे पाणी सोडले जाते, तेथे नागरिक आपली वाहने धूत असल्याचे दिसत आहे. पाण्याचा अपव्यय असाच सुरू राहिल्यास नाईलाजास्तव पाणी कपात करण्याची कडक भूमिका पालिकाला घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.