कोरेगाव – मतदान करणे ही सहज भावनेने केलेली उत्स्फूर्त कृती असावी. खरे तर भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात त्यासाठी प्रबोधन करावे लागू नये, अशी अपेक्षा आहे. तथापि १०० टक्के मतदान होईपर्यंत प्रबोधन चालूच राहील .कारण, मतदान करणे बळकट लोकशाहीसाठी आपले परम कर्तव्य आहे,”असे प्रतिपादन पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रमाचे पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील सुभाषनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर “मतदान, समाज आणि विद्यार्थी” या विषयावर बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी मुख्याध्यापक मंगल शिंदे, केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी,शिक्षक, शिक्षिका तसेच जनजागृती पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले,” विद्यार्थी मतदान करीत नसले तरी मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्त्व त्यांचे मनावर बिंबवायला हवे. म्हणूनच या भावी नागरिकांची मदत संपूर्ण मतदान जनजागृती प्रक्रियेत घेण्यात येत असते. समता, बंधुता ,सामाजिक न्याय ,स्वातंत्र्य या मूल्यांची पेरणी जर बालहृदयात झाली तर लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल. ‘मतदान करा’ असे प्रबोधनातून नागरिकांच्या मनावर ठसवले जाते. तथापि एका क्षणी मतदान करणे ही ही सहज कृती व्हायला हवी, अशी अपेक्षा आहे.