सातारा: महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी

वाई-पाचगणी रस्त्यावरील प्रकार

वाई – वाई-पाचगणी रस्त्यावर बसस्थानक परिसरात किसन वीर महाविद्यालयाच्या तरुणांच्या दोन गटांमध्ये बुधवारी तुंबळ मारामारी झाली. विशेष म्हणजे वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या घराच्या गेटजवळ 25 ते 30 तरुणांमध्ये फिल्मी स्टाइल धुमश्‍चक्री झाल्याचे पाहायला मिळाले. या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये सतत होणाऱ्या मारामाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक व व्यावसायिक करत आहेत.

वाई बसस्थानक व सायली हॉटेल परिसरात किसन वीर महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटांत वादविवाद, हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. कधी शाब्दिक, लाथाबुक्‍क्‍यांनी तर कधी दगड व काठ्यांचा वापर करून हाणामाऱ्या होत आहेत. गावांच्या व देवदेवतांच्या नावांचा जयघोषदेखील सुरू असतो. वाई-पाचगणी रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. काही वेळा पर्यटकांच्या वाहनांचीदेखील तोडफोड झाली आहे.

महाविद्यालयाच्या वेळेत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर वाहनांचा वापर करून तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनी, स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतो. काही प्रमाणात नुकसानही सहन करावे लागत आहे. पोलीस प्रशासनाने शहरात व महाविद्यालय मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत;

परंतु मारामारी करणारे तरुणांचे गट सीसीटीव्हीच्या आड दुसऱ्या गटाला अडवून, वाहने आडवी मारून, फिल्मी स्टाइल हाणामारी करत असतात. या रोडरोमिओंचा पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.