आरटीओ कार्यालयातील फेऱ्या होणार बंद ; स्पर्धेमुळे उत्पन्नात भर
सातारा – वाहन खरेदी करण्याअगोदर आकर्षक नंबर आरक्षित करण्यासाठी नागरिकांची आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारण्यास सुरुवात होते. मात्र, आता राज्य परिवहन विभागाने वाहनांसाठी आवडीचा क्रमांक निवडण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली असून नवीन वाहनांसाठी आकर्षक नंबरचे आरक्षण व पैसे भरण्यासाठी आता वाहन खरेदी करणाऱ्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात फेऱ्या बंद होणार आहेत. ऑनलाइन सुविधेमुळे आकर्षक नंबरसाठी स्पर्धा वाढणार असून आरटीओ कार्यालयाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
सध्याच्या काळात नवीन वाहन खरेदी करताना आकर्षक क्रमांक (चॉईस नंबर) मिळविण्याची धडपड प्रत्येक वाहनधारकाची सुरु असते. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवरील नंबर लक्ष वेधून घेणारा असावा अथवा माझ्या आधीच्या वाहनाचा नंबर नवीन खरेदी केलेल्या वाहनाला पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते. आवडीचा नंबर मिळविण्यासाठी त्याची संकेतस्थळावर पडताळणी करून त्याचे आरक्षण आणि पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. आता ही सेवा पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे.
आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी ‘फॅन्सी परिवहन’ या संकेतस्थळावर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून आपल्या आवडीचा क्रमांक आरक्षित करणे, तसेच त्याचे शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे. मात्र, विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्याची लिलाव प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन होणार आहे. त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाइन पावती देण्यात येणार असल्याचे आरटीओ कार्यालयातून सांगण्यात आले.
आकर्षक क्रमांकाच्या शुल्कात सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. ०००१ या क्रमांकासाठी एका चारचाकी चालकांना ७ ते ९ लाख मोजावे लागत आहेत. त्यामुळे २०२३-२४ मध्ये आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी सुमारे ९ हजार वाहनांच्या नोंद झाली असून त्यातून सुमारे ७ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. या लिलावातून वाहन मालक मागे-पुढे न पाहता आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी दरवर्षी स्पर्धा करत आहेत.
अशी आहे प्रक्रिया
– अर्जदारास आधार लिंक मोबाईल क्रमांक आवश्यक
– संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करा
– उपलब्ध असलेल्या क्रमांकामधून आकर्षक क्रमांक निश्चित करा.
– नंबरचे पैसे ऑनलाइन पेमेंट गेट-वेच्या मदतीने भरा.
– ई-पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करा