सभासद मेळाव्यात माहिती; गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदारसंघ निश्चित
सातारा – जिल्हा मध्यवर्ती बॅंक देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बॅंक आहे. या बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधित्व करताना सभासदांना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या आग्रह आणि इच्छेनुसार आम्ही याच मतदारसंघातुन बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सहकार चळवळीचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा स्वार्थ साधण्याच्या सध्या सुरु असलेल्या अनेक प्रयत्नांमुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून सहन करणार नाही. त्याचा बंदोबस्त करु, असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदारसंघातील मतदार सभासद, कार्यकर्त्यांचा मेळावा येथील हॉटेल लेक व्ह्यूमध्ये आज झाला. त्यावेळी खासदार उदयनराजे बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, सौ. गीतांजली कदम, कराड नगरपालिकेतील गटनेते राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव भिलारे,कराडचे प्रा. आर. के. पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, सौ. रत्नमाला निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
1932 मध्ये सहकार कायदा आला आणि सहकार क्षेत्र एक चळवळ बनली. सहकारातील संघटीत प्रयत्नांमधून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी खऱ्या अर्थाने पाणीपुरवठा, गृहनिर्माण, दुग्धविकास, कुक्कुटपालन, शेळीपालन, ग्रामीण सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका, सोसायट्या, वाहतूक अशा विविध संस्था उभारण्यात आल्या.
एकमेका सहाय करु, अवघे धरु सुपंथ असा विचार सहकाराच्या पाठीशी होता. परंतु, अलिकडच्या काळात सहकाराच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या हिताचे उपदेश द्यायचे आणि करायचे मात्र स्वतःच्या फायदयाचे ही भावना शिरली. अनेक संस्था याच घातक स्वाहाकारी विचारातून खासगी झाल्या. सहकाराचे नेतृत्व व्यक्तीकेंद्रीत झाले, अशी टीका त्यांनी केली. सहकार चळवळ मोडीत काढणाऱ्यांची पदे रद्द केली पाहिजेत. त्यांना कोणत्याही संस्थांचे सभासद- संचालक म्हणून निवडणूक लढवण्यास बंदी कली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या विचारांची संस्था नाही तर मग त्यांचे निवडणुकीतील मताचे ठराव अवैध ठरवून, संकुचित वृत्तीने सहकार क्षेत्र आज वाकवले जात आहे, त्याचा खेद वाटतो, असेही त्यांनी सांगितले. राजेंद्रसिंह यादव, विजयराव भिलारे, भरत पाटील यांनी सहकारक्षेत्रामध्ये आज खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखे निस्पृह नेतृत्व अत्यंत गरजेचे आहे, अशा आशयाची भाषणे केली.
शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. काका धुमाळ, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, सुनील काटकर, सुनील सावंत, डॉ. महेश गुरव, फिरोजतात्या शेख, ऍड.विनित पाटील, ऍड. अंकुश जाधव, ऍड. विकास पवार, रणजीत माने, संग्राम बर्गे, चंद्रकांत भोसले, बाळासाहेब राक्षे, लक्ष्मण कडव, जयवंत पवार आदी उपस्थित होते.