करोनाबळींनी ओलांडला साडेतीनशेचा टप्पा
332 नागरिकांना घरी सोडले
533 जणांचे नमुने तपासणीला
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 12 करोनाबाधित नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 357 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमधून शुक्रवारी 332 जणांना घरी सोडण्यात आले असून 533 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
पाटण येथील 45 वर्षीय पुरुष, उडतारे, ता. वाई येथील 87 वर्षीय पुरुष, उंब्रज, ता. कराड येथील 62 वर्षीय महिला, हिरळी, ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, तारळे, ता. पाटण येथील 64 वर्षीय महिला, कृष्णानगर, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, संगमनगर, सातारा येथील 62 वर्षीय महिला, जयसिंगनगर, सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, या करोनाबाधितांचा सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मायणी येथील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये कलेढोण, ता. खटाव येथील 35 वर्षीय युवकाचा तर विविध खाजगी रुग्णालयांमध्ये वारुंजी, ता. कराड 66 वर्षीय महिला, बनवडी, ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, तामजाईनगर, सातारा येथील 79 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
332 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील रुग्णालये व करोना केअर सेंटरमधील दहा दिवसांच्या उपचारांनंतर 332 नागरिकांना आज घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. कराड तालुक्यातील 146, सातारा तालुक्यातील 62, कोरेगाव तालुक्यातील 39, फलटण तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 14, माण तालुक्यातील 13, जावळी तालुक्यातील आठ, खंडाळा, पाटण, वाई तालुक्यातील प्रत्येकी सात व महाबळेश्वर तालुक्यातील तीन नागरिकांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील नऊ, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 66, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 11, कोरेगाव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगाव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 104, अशा एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.