सातारा | उंब्रज शरद पवार नेहमी एक मंत्र देतात की भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा कराड उत्तरमधील तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे. मनोज दादा आता नुसते उमेदवार नाहीत तर ते कराड उत्तरच्या परिवर्तनाचा जबरदस्त चेहरा आहेत. त्यांना विधानसभेत पाठवा. येणाऱ्या पाचच वर्षात मागील २५ वर्षाचा बॅंकलाॅग भरुन काढतो. आपल्या आशीर्वादाने सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीही करतो, असी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाल (ता. कराड) येथे मल्हारी म्हाळसाकांत यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्र्यांनी श्रीफळ वाढवून केला. त्यानंतर आयोजित सभेत त्यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, अशोकराव गायकवाड तसेच अन्य मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत कराडला ऐतिहासिक महत्त्व आहे. दुर्दैवाने गेल्या २५ वर्षात कराड उत्तरमतदारसंघाची विकासाची व परिवर्तनाची अपेक्षा येथील लोकप्रतिनिधींकडून पूर्ण होताना दिसत नाही. उत्तर कराडमध्ये मनोज दादा, धैर्यशील दादा यांच्यात होणारी मतविभागणी टाळण्यासाठी आपण एकत्र आलो.
फडणवीस म्हणाले. महायुती विकासासाठी निधी देण्यात कुठेही मागे पडणार नाही. अनेक जिल्ह्यांतील दुष्काळी चेहरा पुसून सिंचन योजना राबविल्या आहेत. या परिसरातील मागणीचा विचार करुन तारळीचे पाणी शंभर मीटर हेड करून प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पाण्याचा थेंब थेंब देण्याचे काम आम्ही करू, कराड उत्तरच्या कार्यकर्त्यांनी आमदार नसताना मतदारसंघात 990 कोटी रुपयांचा विकास निधी आणला. ते सत्तेत आले तर पाच वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतील. सोबतीला खासदार उदयनराजे आहेतच, त्यांच्या एका शब्दावर पंतप्रधान मोदी तिजोरी खुली करून देतील. महायुती सरकारने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना सिंचनासाठी दहा हजार कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. येणाऱ्या पाच वर्षाची बिल माफ होतील. पुढील दोन वर्षानंतर राज्यात 24 तास 365 दिवस शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे.
खासदार उदयनराजे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसने कायम निवडून दिले. त्यामुळे इथला विकास थांबला आहे. लोकांच्या भल्यासाठी चांगल्या विचारांनी एकत्र येतात तेव्हा त्याला महायुती म्हणतात आणि आघाडी म्हणजे सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आलेले लोक. कराड उत्तरमध्ये एकास एक उमेदवार देऊन ही लढाई आता एकतर्फी केलेली आहे. मनोज घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.
जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता परंतु या किल्ल्याचे बुरुज ढासळले आहेत, असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राहिलेला उत्तरचा दरवाजा आपल्याला तोडायचा आहे. ते काम कराड उत्तरची जनता करेल. सातारा तालुक्यातील जनता ठामपणे मनोज घोरपडे यांच्या पाठीमागे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या 25 वर्षाचे संकट कराड उत्तरच्या मुळावर येऊन बसले आहे ते दूर करण्यासाठी मतदारांनी तयार राहवे. जिल्ह्यात युतीचे सहा आमदार होतेच यावेळी आणखी दोन घेऊन येत आहे. सदाभाऊ खोत यांनीही बाळासाहेब पाटलांवर टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, उमेदवार मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.