सातारा (प्रतिनिधी) – अन्य जिल्ह्यांमधून सातारा जिल्ह्यात बदलून आलेल्या 121 शिक्षकांना सोमवारी समुपदेशनानंतर शाळा देण्यात येणार होत्या. या बदल्या दि. 8 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सगळी तयारी झाली असताना बदली प्रक्रिया अचानक पुढे ढकलण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
परजिल्ह्यांमधील 121 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्ह्यात आले आहेत. करोनामुळे या शिक्षकांना नेमणुका देण्यात आल्या नव्हत्या. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारी या बदल्या करण्यात येणार होत्या.
त्याची तयारी शिक्षण विभागाने केली होती; परंतु ही प्रक्रिया अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले जिल्ह्याबाहेर असून, ते परत आल्यावर बदल्यांची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले.