Satara Traffic Police – सातारा शहरातील वाढत्या वाहतूक गोंधळ आणि ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी नाके उभारून मॉडिफाइड सायलेन्सर, अवैध नंबर प्लेट, काळ्या काचा तसेच सायरन लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला आहे. विशेषतः बुलेटसारख्या दुचाकींना मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवून शहरात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याने अशा वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि शाळा परिसरात विशेष तपासणी केली जात आहे. पोलिसांनी काही वाहनधारकांना जागीच दंड आकारून वाहनांमधील अनधिकृत बदल काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. वाहनांवरील काळ्या फिल्ममुळे सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होतो, तर सायरनचा गैरवापर केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.