भुईंज : वाई तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी रात्रंदिवस काबाडकष्ट करत हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत टोमॅटोचे पीक जोमात आणले. मात्र, बाजारपेठेत टोमॅटोचे दर गडगडल्याने उत्पादक शेतकरी आथिर्क संकटात सापडले आहेत. टोमॅटो पिकासाठी केलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून दर नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
शेतकऱ्यांनी मोठा खर्च केलेल्या टोमॅटोला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोला दर नसल्याने शेतकरी सध्या आथिर्क विवंचनेतून मार्गक्रमण करत असल्याचे चित्र वाई तालुक्यात दिसत आहे. गाडी खर्च सुद्धा निघत नसल्याने गाडी भाडे खिशातून द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. कधी अवकाळी, कधी अस्मानी- सुलतानी, तर कधी मातीमोल बाजारभावामुळे निसर्गाच्या दृष्टचक्रातून मार्गक्रमण करणाऱ्या बळीराजाच्या टोमॅटोसह कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, पालक, गाजर यांसह अनेक भाजीपाल्यांना दर नसल्यामुळे संकटाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाई तालुक्यातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळलेला असताना दर नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढू लागली असून उन्हाळ्यात टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. यंदा पावसाळ्यात वरुणराजा मोठ्या प्रमाणात बरसल्यामुळे वाई तालुक्यात सर्वत्र मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, कोबी, कोथिंबीर याची लागवड केली. मात्र, सर्वच भाज्यांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च व मजुरीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटोसह फ्लॉवरचे दर सुद्धा ढासळलेले आहेत. शेतकरी वर्ग शेतीवर अवलंबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मुख्यतः लहान मुलांप्रमाणे जपलेल्या टोमॅटो पिकाला डोळ्यासमोर उध्वस्त होताना शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून उत्पादन घेतले. मात्र, दर नसल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
उत्पादन खर्चही निघेना
एक एकरातील टोमॅटो पिकासाठी साधारणतः५० ते ६० हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. तोडणीसाठी मजुरीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, केलेला खर्चही भरून काढणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्लॉवरला सुद्धा चांगली मागणी असते. मात्र, बाजारपेठेत फ्लॉवरची आवक वाढल्याने त्याचे भाव सुद्धा घसरल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.