सातारा : राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वाची असते. या विभागामार्फत रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारतींची बांधकामे व महत्त्वाची विकासकामे करून, जनतेला सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई येथे ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अप्पर मुख्य सचिव (वित्त), अप्पर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदींसंदर्भात आढावा घेण्यात आला. अर्थसंकल्पीय तरतुदींशी संबंधित मुद्द्यांवर व्यापक विचारविनिमय करून, विभागाच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमुळे विभागाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीच्या उपलब्धतेस गती मिळण्याची शक्यता आहे.