सातारा : खाजगी हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यास तूर्त मंजुरी नाही

प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे; ऑक्‍सिजनच्या उपलब्धतेनंतर देणार परवानगी

सातारा : जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये (डीसीएजसी, डीसीएच व सीसीसी) मिळून 82 हॉस्पिटलमध्ये 16 हजार 626 करोना संक्रमित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 58 खाजगी हॉस्पिटलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु आणखी खाजगी हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यास तूर्त परवानगी दिली जाणार नाही. ऑक्‍सिजनच्या उपलब्धतेनंतर अशी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

सद्य स्थितीत जिल्ह्यात आणखी 20 खाजगी रुग्णालयांच्या प्रशासनाने त्यांच्याकडील हॉस्पिटलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. तथापि, ऑक्‍सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्‍शन्सच्या तुटवड्यामुळे या खाजगी हॉस्पिटल्सचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याची परवानगी देणे उचित ठरणार नाही.

भविष्यात ऑक्‍सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्‍शन्सची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यास या 20 खाजगी हॉस्पिटल्सचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयात दैनंदिन लागणाऱ्या ऑक्‍सिजनपेक्षा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे.

अत्यावश्‍यक रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्‍यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्‍शनसुद्धा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. ऑक्‍सिजन व रेमडेसिवीर इंजेक्‍शन्सचा आवश्‍यक तेवढा पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासन शासनाकडे युद्धपातळीवर पाठपुरावा करत आहे. जिल्ह्यासाठी आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन व रेमडेसिवीर इंजेक्‍शन्स लवकच उपलब्ध होतील, असे शिंदे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.