सातारा : जिहे कटापूर आणि उरमोडीचे पाणी माझ्यामुळेच-आ. जयकुमार गोरे

माझ्यामुळेच अनेकांना मिळाली पाणीपूजनाची संधी
सातारा –
जिहे कटापूर आणि उरमोडी योजना मार्गी लावायचे ध्येय ठेवूनच मी राजकारणात आलो होतो. उरमोडीचे पाणी 105 गावांची तहान भागवित आहे. जिहे कठापूरच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग पूर्णत्वाला जात आहे. या योजना कुणामुळे मार्गी लागल्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे. माझ्यामुळे अनेकांना अनेक वेळा पाणी पूजनाची संधी मिळाली आहे.

आताही कुणी मिरवणूका काढतोय, कुणी घागरी घेऊन फिरतोय तर कुणी पवारसाहेबांना जलपूजनासाठी येण्याचे साकडे घालतोय, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
मलवडी येथील श्री खंडोबा रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, “”जिथून माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली त्या श्री खंडोबा मंदिरातून एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार या प्रवासाची सुरुवात झाली. माझ्या राजकारणाचे केंद्र असणारे मलवडी गाव कायमच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात उपेक्षित असणारा हा भाग माझ्या राजकारणात येण्याने मुख्य पटलावर आला. अगदी माझ्या विरोधकांनाही न्याय मिळू लागला. माण- खटावमधील जवळपास 105 गावांना बारमाही पाणी मिळू लागले. ऊसाची शेती आणि साखर कारखानदारी सुरु झाली. आज ज्या जिहे-कटापूर योजनेचे पाणी पूजण्यासाठी चढाओढ सुरु आहे ते जिहे-कटापूरचे पाणी जयकुमार आमदार नसता तर आलंच नसतं.

जयकुमार होता म्हणूनच पाणी आलं. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ते पाणी माणमध्ये येईल. आंधळी धरणात पाणी येईल तेव्हाच मला खरा आनंद होईल.” या योजनेला लागणारा 850 कोटींचा निधीही केंद्राकडून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून दोन महिन्यांत मिळेल. जिहे- कटापूरचे काम पंचवीस टक्केच पूर्ण झाले आहे.

उर्वरित काम पूर्ण व्हायचं आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद माजी सदस्य अर्जुन काळे, सरपंच दादासाहेब जगदाळे, बाळासाहेब कदम, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू पोळ, उपसरपंच जगदीश मगर, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्टचे चेअरमन जगन्नाथ सत्रे, किसन सस्ते, प्रसाद शिंदे, संतोष मगर, सचिन मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

एकेक संकल्प जातोय पूर्णत्वाला…
माण- खटावमधील जनतेला जो शब्द देऊन आणि जे संकल्प करुन राजकारणात आलो ते एकेक संकल्प पूर्णत्वाला जाऊ लागले आहेत. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्‍यांत आणून 105 गावांची तहान भागविली. आता लवकरच जिहे कटापूरचे पाणी आंधळी धरणात आणि उत्तर भागातील 35 गावापर्यंत पोहचविणार आहे. जयकुमार आहे म्हणूनच पाणी आलेय हे विरोधकही मान्य करतात असेही आ. गोरे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.