द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फलटणमध्ये राष्ट्रवादीलाच अधिक फायदा

अजय माळवे नगरपरिषद निवडणुकीत राजे गट विरुद्ध भाजप दुरंगी सामना रंगण्याची शक्‍यता

फलटण  -राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सध्याची द्विसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या द्विसदस्यीय पद्धतीमुळे फलटण नगरपरिषदेत “जैसे थे’ परिस्थिती राहणार असून, विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंगेसलाच याचा फायदा होणार असल्याचे स्पष्ट आहे.फलटण नगरपरिषदेची मुदत 20 डिसेंबरला संपत आहे. विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यास केवळ अडीच महिने बाकी आहेत.

निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली, तरी निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रभाग रचना कशी असेल? मागील रचनेप्रमाणे असेल की, नव्याने प्रभाग रचना होणार आहे, याचा तपशील मिळालेला नाही. कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशीही शक्‍यता आहे; परंतु काहीही झाले, तरी इच्छुक उमेदवारांनी आपला मूळचा प्रभाग डोक्‍यात ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

फलटणमध्ये मागील वेळी 12 प्रभाग होते. प्रत्येक प्रभागात दोन आणि शेवटच्या प्रभागात तीन, असे 25 नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद लोकनियुक्त होते. मध्यंतरी एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेऊन, नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडणार, असे ठरले होते; परंतु पुन्हा द्विसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा फायदा फलटणमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच होणार असल्याचे स्पष्ट आहे.

निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आराखडे बांधायला सुरुवात केली आहे. फलटण नगरपरिषदेच्या गेल्या निवडणुकीत विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गट (राष्ट्रवादी) आणि कॉंगेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस यांच्यात दुरंगी सामना पाहायला मिळाला होता.

 

सह्याद्री चिमणराव कदम यांनी भाजपचे पॅनेल टाकून काही ठिकाणी चांगली मते मिळवली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 17 व कॉंग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नीता नेवसे जनतेतून निवडल्या गेल्या होत्या. कालांतराने रणजितसिंह यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी देऊन पक्षात घेतले. ते निवडूनदेखील आले.

आगामी निवडणूक पुन्हा रामराजेंच्या नेतृत्वाखालील राजेगट आणि खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप, असा सामना होण्याची शक्‍यता आहे. तिसऱ्या आघाडीचीही चर्चा आहे. ही आघाडी झालीच ती भाजपची मते खाणार, हे निश्‍चित असल्याने राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे. एकसदस्यीय पद्धतीची निवडणूक राष्ट्रवादीला जड गेली असती, असे बोलले जात होते; परंतु द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने गेल्या वेळी निवडून आलेल्या नगरसेवकांना एकमेकांची मदत होणार आहे. सध्या तरी फलटण नगरपरिषद निवडणुकीत राजेगटाचे पारडे जड आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.