सातारा (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने कारमधून निघालेल्या विश्वजीत शंकर फरांदे (रा. आनेवाडी, ता. सातारा) यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून सचिन दिलीप जमदाडे, वैभव संजय पवार (दोघे रा. लिंब, ता.सातारा) यांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फरांदे यांचा औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय असून, ते दि.8 रोजी कार (एमएच-11-बीव्ही-6768) मधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकी (एमएच-11-सीए-2574) वरून आलेल्या दोघांनी फरांदे यांच्या कारला दुचाकी आडवी मारली. कारमध्ये काय आहे? औषध वाहतुकीचा परवाना आहे का, असे विचारून संशयितांनी फरांदे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती.
त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सातारा तालुका पोलिसांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांची माहिती काढून सापळा लावला होता. संशयित हे साताऱ्यातील एक चौकात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेला मोबाइल व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई फौजदार ज्ञानेश्वर दळवी, प्रसन्न जऱ्हाड, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, सागर निकम,सतीश पवार, नितीराज थोरात, विशाल पवार, साबीर मुल्ला,प्रमोद सावंत,रोहित निकम,विजय सावंत,विजय कांबळे,मुनीर मुल्ला,सुधीर बनकर,अतिश घाडगे यांनी केली.