सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरीहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. आता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना, ताग, धैंचा हिरवळीच्या खताच्या बियाणांसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठराव समितीच्या सभेत या विषयाला मान्यता देण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येत असणार्या विविध योजनांची दखल राज्यस्तरावर घेण्यात येते. कृषी विभाग दरवर्षी शेतकरी हितासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवत असतो. पिकांची वाढ होण्यासाठी आणि शाश्वत उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. जमिनीची संरचना व घडण उत्तम राहण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकर्यांना थेट वैयक्तिक लाभ हस्तांतरण पद्धतीने ताग व धैंचा हिरवळीच्या खताच्या बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी लाभार्थी शेतकर्याच्या नावाचा सातबारा उतारा, बँक पासबुक, रेशनकार्ड, विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे. ताग, धैंचा 0.40 हेक्टरसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा 1500 रुपये यापैकी कमी असेल, इतके अनुदान देण्यात येणार आहे. लक्षांकापेक्षा जादा अर्ज आल्यास पंचायत समिती स्तरावर लॉटरी काढून, अर्जदारांची निवड करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी दिली.
या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व महिला शेतकर्यांना शासनाच्या प्रचलित सूचनांप्रमाणे राखीव लक्षांक राहील. योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकर्यांनी ऑफलाइन पद्धतीने पंचायत समिती कार्यालयात दि. 30 जानेवारीपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी केले आहे.