फलटण : राज्यात दुधाचे दर घसरले आहेत. दुधाला प्रत्येक लिटर ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशा जाहिराती राज्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी तसेच शासनाने जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले.
मात्र, निवडणुका झाल्या तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर दुधाचे अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान ३३९ कोटी राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशा मागणीचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार अभिजित जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाचा दर प्रति लिटर १० ते १२ रुपयांनी घसरला आहे. गायीच्या दुधाला सध्या २६ रुपये प्रति लिटर दर मिळत आहे.त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांचा चाऱ्यापाण्याचा खर्च,पशु खाद्याचा खर्चही वसूल होत नाही. सध्या दूध उत्पादक शेतकरी कर्जात बुडाला असल्याचे वास्तव आहे. पाणी व चारा टंचाईमुळे दूध व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे.
दुधाचे दर कमी झाले म्हणून शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची शासनाने यापूर्वी घोषणा केली होती. मात्र, घोषणा ही नुसती घोषणाच असल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अटी व शर्ती व ऑनलाइन नोंदणीच्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचण येत आहेत. सरकारने अनुदानाची घोषणा केली तरी मार्च महिना संपत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान मिळाले नाही.