सातारा : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात कडकडीत बंद

बाजारपेठा ओस ; रस्त्यावर फिरणाऱ्यांना "खाकी'चा हिसका

सातारा : करोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने “ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रशासनाने मंगळवारपासून आठवडाभरासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी सकाळी 7  वाजल्यापासून सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

राष्ट्रीय महामार्ग वगळता जिल्ह्यातील जवळपास सर्व रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. पोलिसांच्या खड्या पहाऱ्यामुळे जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
लॉकडाऊनमध्ये किराणा माल, भाजीपाला, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई आदी सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहेत; परंतु सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच सेवा देण्याची परवानगी आहे. या विक्रेत्यांच्या याद्याही प्रशासनाने समाजमाध्यमांद्वारे प्रसारीत केल्या आहेत. घरपोच सेवा मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सातारा शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडस्‌ लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवई नाका, कमानी हौद, मोती चौक, राजवाडा, देवी चौक, बसस्थानक परिसर, मोळाचा ओढा, बोगदा परिसरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करून वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे दुपारनंतर साताऱ्यातील प्रमुख रस्ते ओस पडले होते. राधिका रोडवर मात्र कुठेच पोलीस बंदोबस्त नव्हता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.