सातारा: बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता; व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड मिळेनात
संदीप राक्षे
सातारा –
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून जिल्ह्यातील एकूण 18 केंद्रांवरील 1102 बेडस्‌ची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. बाधितांचा रोजचा आकडा तीनशे- चारशेपर्यंत असल्याने बेडस्‌ची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे; पण ती तारेवरची कसरत ठरत आहे.

जिल्ह्यातील करोनाचा उद्रेक सुरुच असून आजअखेर रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात 5947 रुग्णांनी करोनावर मात केली असून अजून उपचार सुरू असलेले 4382 रुग्ण आहेत. करोनाबळींची एकूण संख्या 324 झाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाची बेड क्षमता 114 आहे. एका वॉर्डात आणखी पंधरा तर प्रिझन वॉर्डात सात खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागात आणखी 24 खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. फलटण, कराड येथील उपजिल्हा रुग्णालये, वाईतील ग्रामीण काशीळ येथील कोविड उपचार केंद्रांवर याच पध्दतीने बेडची सुविधा दिली जाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न आहेत. 15 जुलैपासून रुग्णांची रोजची संख्या सव्वाशेवरून वाढत चारशेच्या घरात गेली.

जिल्ह्यात ऑक्‍सिजन बेड 276 असून व्हेंटिलेटर बेड 172 आहेत. अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याने तत्काळ बेड उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. ऑक्‍सिजनच्या जंबो सिलिंडरची व्यवस्था करून तो सेंट्रल लाईनने बेडला कनेक्‍ट करणे अशा सुविधा उभारताना रुग्णवाढीच्या तुलनेत प्रशासनाला पुरेसा वेळच मिळाला नाही. सातारा व कराड येथील काही खासगी रुग्णालय प्रशासनांशी आरोग्य यंत्रणेची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, “बाधित रुग्णांची संख्या 15 जुलैनंतर तिपटीने वाढली. या रुग्णांमध्ये सारीच्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के आहे. अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण 15 टक्के आहे. करोनाची सौम्य लक्षणे व इतर आजारांमुळे श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. बाधित रुग्णांचा रोजचा आकडा चारशेवर पोहचल्याने गंभीर रुग्णांचे रोजची सरासरी 40 ते 60 रुग्णांची आहे.’

ऑक्‍सिजन बेडची क्षमता
जिल्हा रुग्णालय- 100, कृष्णा कराड- 43, सह्याद्री हॉस्पिटल- 5, संजीवन हॉस्पिटल- 10, फलटण डॉक्‍टर्स असोसिएशन- 10, मंगलमूर्ती हॉस्पिटल- 8, साईअमृत- 5, सिम्बॉयोसिस हॉस्पिटल- 14, सातारा हॉस्पिटल- 29, समर्थ हॉस्पिटल- 8, सावित्री हॉस्पिटल- 29, बेल एयर हॉस्पिटल- 15, गीतांजली हॉस्पिटल- 15, एसडीएच हॉस्पिटल- 24, मायणी मेडिकल कॉलेज – 10, शारदा क्‍लिनिक कराड- 30, संचित हॉस्पिटल- 12, श्री हॉस्पिटल कराड- 9.

गंभीर रुग्णाला बेडची कमतरता भासणार नाही
जिल्ह्यातील हॉस्पिटल्सची तसेच बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. ज्या गंभीर रुग्णांना बेडची आवश्‍यकता आहे, त्यांना बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, ज्यांना अतिदक्षता विभाग किंवा व्हेन्टिलेटरची गरज नाही, अशा रुग्णांनी बेड मागू नये. होण आयसोलेशनही सुरू केले आहे. गंभीर रुग्णांसाठी बेडची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. सध्या 108 च्या 32 रुग्णवाहिका उपलब्ध असून आणखी नवीन 100-125 रुग्णवाहिका जिल्ह्यात येत आहेत. आम्ही स्रव काळजी घेत आहोत. खासगी हॉस्पिटलच्या बिलाबाबत तक्रार असल्यास 1077 क्रमांकावर माहिती द्यावी. तक्रारीची शहानिशा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.