सातारा – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी गावाच्या हद्दीत सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकने 6 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. एका कारला दिलेली धडक इतर पाच वाहनांनाही बसली. ट्रकने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनार कारला धडक दिल्याने कार मधील तीन जण जागीच ठार झाले आहेत तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.हा विचित्र असा अपघात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ धनगरवाडी येथे घडला.
या दरम्यानच अपघातग्रस्त ट्रकने दुधाचा टँकर, माल ट्रक तसेच स्कॉर्पिओ आणि आणखी एक वाहन अशा पाच वाहनांना धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.अपघात स्थळावर शिरवळ आणि खंडाळा पोलीस पोहोचले असून ट्रॅक्टरच्या मदतीने चक्काचूर झालेल्या वॅगनार कार मधील मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.