सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात चांगलाच राडा झाल्याचे समोर आले. कारण केवळ एका मताने पराभव झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. या दगडफेक प्रकरणी आता खुद्द शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.
शशिकांत शिंदे यांनी, “मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो. असे म्हटले आहे. तसेच शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन देखील यावरली शिंदे यांनी केले आहे.
मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केलं. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.
ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.