सातारा : फिरस्त्या कुटुंबीयांना कोणी घर देता घर…

कराड बसस्थानकात थाटला संसार
पुनर्वसित जागी ना सोय ना सुविधा
पराग शेणोलकर
कराड –
कराड तालुक्‍यातील फिरस्त्या कुटुंबाची परवड काही केल्या संपेना. पोटाचा खळगी भरण्यासाठी भीक मागून वेळप्रसंगी चोऱ्यामाऱ्या करून जगण्याची वेळ आलेल्या फिरस्त्या कुटुंबांचे महसूल व पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी पूर्नवसन केले आहे. मात्र, तेथे ना घर ना मुलभूत सुविधा त्यामुळे त्यांनी सध्या आपला संसार कराड येथील आयडॉल बसस्थानकात थाटला आहे.

फासेपारधी हे एका भटक्‍या जातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्य प्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करताना दिसतात. ब्रिटीश राजवटीत विविध भटक्‍या जमातींना गुन्हेगार जमाती कायदानुसार ठरविण्यात आले होते. तेंव्हापासून आज तागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसल्या गेलाही नाही. हा ठपका पुसून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आजही सुरूच आहेत. यातून काही शिकले, शासकीय अधिकारी बनले मात्र अजून म्हणावा असा हा समाज मुख्य प्रवाहात आलेला नाही. पारंपारिक शिकार या व्यवसायाला बाजुला ठेवून तो चोऱ्यामाऱ्या करण्याकडेही वळण्याचे आजपर्यंतच्या विविध घटनांवरून दिसून आले आहे.

कराड तालुक्‍यातील या फिरस्त्या समाजातील कुटुंबाचे पुर्नवसन पोलीस प्रशासनाने महसूल विभागाच्या सहकार्यातून केले. येथील ओगलेवाडी, कार्वे, वहागाव, शेणोलीस्टेशन, आगाशिवनगर आदी ठिकाणी पुर्नवसन करून जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यांना राहण्यासाठी ना घर ना मुलभूत सुविधा मिळाल्याने या फिरस्त्यांनी कराड शहराला आपले घर बनवले आहे. येथील कोल्हापूर नाक्‍यावरील उड्डाण पूलाखाली तळ ठोकला होता. परंतु, त्यांचा उपद्रव ऐवढा वाढला की अखेर नागरिक व प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने या फिरस्त्यांची पुर्नवसन ठिकाणी संसार उपयोगी साहित्यासह त्यांची रवानगी केली.

पारधी समाजाचे नेते प्रकाश वायदंडे यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित कुटुंबीयांची मनधरणी केली. त्यांच्या उपस्थितीत संबंधित कुटंबीयांना खाण्यापिण्याचे साहित्य देऊन शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्यांची ओगलेवाडी येथे रवानगी केली. ओगलेवाडी येथे पुर्नवसन केलेल्या फिरस्त्या कुटुंबांकडे रेशनकार्डसह सर्व शासकीय दस्ताऐवज असतानाही त्यांना पुर्नवसित ठिकाणी जागा आहे. मात्र, राहिण्यासाठी घर नाही. वीज व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. अशा परिस्थिती आम्ही तेथे राहणार कसे? आमची पोरबाळ जगणार कशी? तसेच येथील स्थनिक लोकांचाही आम्हाला विरोध आहे. त्यामुळे आम्ही तेथून परत आलो असल्याचे बस स्थानकात संसार मांडून बसलेल्या फिरस्त्या कुटुंबातील महिला सांगत आहेत. त्यामुळे या फिरस्त्या कुटुंबांना “कोणी घर देता का घर’अशीच म्हणण्याची वेळ आल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
कराड तालुक्‍यातील फिरस्त्या फासेपारधी कुटुंबांची परवड गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ही कुटुुंबे तालुक्‍यासह शहरात मोकळी जागा मिळेल तेथे आपला संसार थाटत आहेत. सध्या या कुटुंबांनी शहरातील आयडॉल बसस्थानकात आपला संसार थाटला आहे. आपले संसार उपयोगी साहित्यासह जेवण आंघोळ तसेच धुणी-भांडी करण्यासाठी बस्थानकाच्या रणवेवर कपडे वाळत घालण्यासाठी प्रवासी बसण्यासाठीच्या निवारा शेडचा आधार घेतला आहे. त्यामुळे बसस्थानकात अस्वच्छता, दुर्घंधी पसरली आहे. त्यांची लहान लहान मुले रणवेवर खेळत असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना पुनर्वसित ठिकाणी घरे व मुलभुत सुविधा देण्याकामी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.